वैजी येथील आंब्रे परिवाराने साकारला ‘कोकणचा राखणदार’ संकल्पनेवर आधारित आगळावेगळा आणि प्रबोधनात्मक चलचित्र देखावा
चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने वैजी (ता. चिपळूण) येथील आंब्रे परिवाराने ‘कोकणचा राखणदार’ या संकल्पनेवर आधारित एक आगळावेगळा आणि प्रबोधनात्मक चलचित्र देखावा साकारला आहे. या देखाव्यातून त्यांनी “कोकण वाचवा…निसर्ग वाचवा… आणि कोकणाची जैवविविधता जपा!” असा संदेश दिला आहे.
या देखाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो… कोकणचा समृद्ध निसर्ग, हिरवीगार जंगलं, डोंगर-दऱ्या, नद्या-धबधबे, कोकणातील पारंपरिक घरं आणि कोकणची समृद्ध जैवविविधता. मात्र हा देखावा केवळ कोकणच्या सौंदर्याचं दर्शनच घडवत नाही तर कोकणातील जलप्रदूषण… हवाप्रदूषण… बेसुमार जंगलतोड… आणि निसर्गाचा होत असलेला विनाश…या सर्व प्रश्नांवर भाष्य करते ‘कोकण वाचवा… जमीन वाचवा… निसर्ग वाचवा… आणि जैवविविधता जपा!’ असा महत्त्वपूर्ण संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे परिसरातील नागरिकांसह निसर्गप्रेमी भक्तांचीही या देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. गणरायाच्या उत्सवातून मनोरंजनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच लक्षवेधी ठरत आहे.












