महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची राष्ट्रीय परिषद उत्साहात

आंबेडकर बंधूंचा पाठिंबा आणि उपस्थिती एकजुटीने देशव्यापी आंदोलनाचा निर्धार

चिपळूण (प्रतिनिधी) : महाबोधी महाविहार लिबरेशन कौन्सिल ऑफ इंडिया (M.L.C.) च्या वतीने आयोजित २ दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्यअध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर व बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यापुढे एकजुटीने मोठ्या ताकदीने उभे करण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाचा निर्धार करण्यात आला.
दिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक कार्यकर्ते सीवूड्स, नवी मुंबई येथे जमा झाले. सम्यक फाऊंडेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, सेक्टर-४८ येथे ही परिषद पार पडली. ज्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पहिल्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाचा लढा कसा लढला जात आहे आणि त्यामध्ये कोणत्या अडचणी उद्भवत आहेत ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या पुढच्या काळात रस्त्यावरील लढाई आणि न्यायालयीन लढाई कशाप्रकारे लढायला पाहिजे? याबद्दलचा एक आराखडा आपल्या मनोगतआतून त्यांनी मांडला. दुपारच्या सत्रात महाबोधी महाविहार लिब्रेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संघटनेच्या निर्मिती संदर्भात ॲड. दिलीप काकडे यांनी सविस्तर मांडणी केली. तसेच यावेळी काही नॅशनल कोअर कमिटी सदस्य आणि नॅशनल कौन्सिल सदस्य निवडण्यात आले. तसेच मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात रमाई महिला मंडळाच्या सामूहिक त्रिसरण-पंचशील ग्रहणाने झाली. यावेळी देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “हे आंदोलन आता पूर्ण भारतभर करावे लागणार आहे. कोर्टाची लढाई आणि रस्त्यावरची लढाई दोन्ही लढावी लागणार आहे. यासाठी जे जे करता येईल ते आपल्या घरचा प्रश्न समजून हे आंदोलन यशस्वी करा. महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे. १९४९ चा काळात बी.टी. कायदा रद्द करण्यासाठी देशभर एकजुटीने लढा उभारला पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, सर्व भारतीयांना या मुक्ती आंदोलनात सामील करून घेऊन केंद्र सरकारवर दबाव गट तयार करावा लागणार आहे. प्रमुख ठराव व चर्चा दुपारच्या सत्रात ॲड. दिलीप काकडे यांनी महाबोधी महाविहारबाबत प्रास्ताविक करून चार्टर ऑफ डिमांड आणि पुढील ऍक्शन प्लॅन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परिषदेत ६ प्रमुख विषयांवर शिक्कामोर्तब झाले: १. राष्ट्रीय स्तरावर कौन्सिल सदस्यांची निवड २. भारत सरकारला सादर करण्यासाठी चार्टर ऑफ डिमांड ३. राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाची दिशा ४. बोधगया मंदिर कायदा, १९४९ रद्द करणे ५. महाबोधी विहार व्यवस्थापनासाठी केंद्रीय कायदा करणे ६. महाबोधी विहाराला प्राचीन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणे उपस्थित मान्यवर परिषदेच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र पवार, दादासाहेब मर्चंडे, ऍड. दिलीप काकडे, ऍड. विजय तळेकर, डॉ. मुकेश दुपारे, शशिकांत भालेराव, संदीप साबळे, ॲड. कुशल जंगलबाग यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये कर्नाटकातून राहुल हुलमानी, शिवानंद शिंदे, वेंकटेश होसामानी, विदर्भातून उत्तम भगत, ज्योती पाटील, वसंत फुलझेले, शरद चौरपगार, तामिळनाडूतून वीरार्सीम्मान, सशीकुमार, तसेच गुजरात, केरळ, बिहारमधून राजेश बोध आणि महाराष्ट्रातील नागपूर, रत्नागिरी, पनवेल येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक पवार, पूजा पवार, सुभाष पवार, सुरेश जाधव, किशोर जाधव व सुरेश यादव यांनी अथक परिश्रम घेतले.