राजापूर BREAKING : पाचल विद्यानगरमध्ये शिक्षक दांपत्याचे बंद घर फोडले; साडेसहा लाखांचा मुद्देमाल लांबवला

राजापूर | प्रतिनिधी : राजापुरात महामार्गावर खरवते येथे पोलीस पाटलांच्या घरी झालेली चोरीची घटना ताजी असतानाच पुर्व भागात पाचल-विद्यानगर येथे एका शिक्षक दांपत्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराने उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील कपाटे व तिजोरी उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज लांबविला आहे. या प्रकाराने पाचल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६, व्यवसाय-शिक्षक, तुळसवडे हायस्कूल, रा. पाचल, विद्यानगर, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (क), ३३१(३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरजादे यांच्या पाचल-विद्यानगर येथील राहत्या घरात १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली आहे. पिरजादे हे १२ सप्टेंबर रोजी आपले घर बंद करून मुलाच्या शैक्षणिक कामासाठी पुणे येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे तसेच तिजोरी उघडून त्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंडचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड तसेच १२ हजार रुपये रोख यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे व आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून तपास सुरू केला आहे. तर उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देत तपास कामी मार्गदर्शन केले. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, घरफोडीच्या या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर तात्काळ ठसे तज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे अधिकारी यांनी देखील घटनास्थळी भेट देत पहाणी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.