वार्तापत्र कोकण /संतोष वायंगणकर
गणेशोत्सवाच्या धामधुमीत संपूर्ण कोकण आनंदाने न्हाऊन निघाले असले, तरी ऐन गर्भाच्या टप्प्यात असलेल्या भातशेतीवर पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले आहे. करपणाऱ्या पिकांची चिंतेत सापडलेल्या कोकणवासीयाला सरकारी मदतीची दारे उघडी राहावीत आणि पिकांच्या नुकसानीत दिलासा मिळावा म्हणून गावी आलेल्या चाकरमान्यांनी आणि स्थानिकांनी तातडीने शेतीचे डिजिटलायझेशन करणेही तेवढेच महत्वाचे आहे.
…………
कोकण आणि पावसाचे नाते हे अत्यंत जिवाभावाचे! हिरव्यागार सौंदर्याने नटलेली येथील शेतीभाती आणि हिरवाकंच सह्याद्री हे याच नात्याचे प्रतीक. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या अवघ्या काही दिवसांआधी पावसाने घेतलेली विश्रांती जसजशी लांबत चालली आहे, तसतसा कोकणातील शेतकरी कमालीचा हतबल दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या दिवसांत धुक्याच्या चादरीत पहाट उजाडते खरी, पण दिवस जसजसा पुढे सरकतो, तसतशा रखरखत्या उन्हामुळे शेती अधिकच मलूल पडताना दिसत आहे. खरं तर हा काळ ऊन-पावसाच्या खेळाचा… भातशेती गर्भार अवस्थेत पोहोचलेली…नव्या तांदुळाचे दूध पोटात धरून भाताची लोंबी बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच या भातपिकावर मोठे संकट कोसळले आहे. भरडी शेती कडक ऊन आणि पाण्याच्या टंचाईमुळे करपू लागली आहे, तर अनेक ठिकाणी पिकाला ‘करप्या’ रोगाने ग्रासले आहे. तळकोकणातील बहुतांश भागांत दिसणारे हे चित्र भावी काळातील मोठ्या संकटाची चाहूल देत आहे.
वास्तविक पाहता, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रावर यंदा पावसाची सुरुवातीपासूनच वक्रदृष्टी होती. ‘अल निनो’च्या परिणामांची जाणीव हवामान विभाग सातत्याने करून देत होता. या दरम्यान दरवर्षीसारखी पावसाची मुसळधार हजेरी नसली, तरी सुरुवातीचा ताणलेला काळ सोडून जुलै आणि ऑगस्टचा टप्पा शेतीला पूरक असाच राहिला. मात्र, सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाचा अंदाजही धुळीस मिळवत पावसाने कोकणाकडे पाठ फिरवली. यामुळे कोकणात भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यावर संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे.
सिंधुदुर्गात शेतीची जी अवस्था आहे, तीच विदारक परिस्थिती रत्नागिरीतही पाहायला मिळत आहे. नव्या भाताला जन्म देण्यासाठी पोटात आलेली लोंबी बाहेर पडण्यासाठी सध्याचे हवामान मुळीच पोषक नाही. आता शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत. ऐन गणेशोत्सवात नद्या-नाले संथ झाल्याने, “यंदा कोकणालाही तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार की काय?” अशी भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद, तर दुसरीकडे पिकांच्या नुकसानीची चिंता—अशा दुहेरी मनःस्थितीत कोकणवासी सध्या सापडला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी आणि नोकरदार मंडळींनी आपल्या हातातील स्मार्टफोनचा वापर करून शेतीचे अद्ययावतीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे झालेले नुकसान जर सरकारी दप्तरी नोंदवले गेले नाही, तर शेतकऱ्याला शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्यता असते. अनेकदा सरकारी मदत मिळवताना प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आता राज्य सरकारने शेतीशी संबंधित सर्व नोंदणी प्रक्रिया डिजिटल केली आहे. त्यामुळे शेतकरी स्वतः तंत्रस्नेही नसेल, तर गावी आलेल्या चाकरमान्यांनी पुढाकार घेऊन त्यांना डिजिटल प्लॅफॉर्मवर अपडेट करणे ही गरजेची गोष्ट आहे.
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएम-किसान सन्मान निधी, महाडीबीटी पोर्टलवरील योजना, पीक विमा, पीक कर्ज, शासकीय भात खरेदी आणि ऑनलाइन खत खरेदी या सर्व सुविधांसाठी हा आयडी अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या CSC (ग्राहक सेवा केंद्र) येथे जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायला हवा.
‘पीएम-किसान सन्मान निधी’चा हप्ता विनाखंड मिळण्यासाठी e-KYC, लँड सीडिंग (Land Seeding) आणि Aadhaar Seeding या प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्यांची ही कामे अपूर्ण आहेत, त्यांनी गावी असतानाच ती पूर्ण करून घ्यावी. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि शासकीय भात खरेदीसाठी ई-पीक पाहणीची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भात, नाचणी तसेच फळपिकांची नोंद ‘DCS MH’ ॲपद्वारे तातडीने करायला हवी.
“असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी…” ही वृत्ती आता बाजूला ठेवावी लागेल. बदलत्या हवामानाच्या आणि निसर्गाच्या लहरीपणाच्या काळात प्रत्येक कोकणवासीयाने स्वतः सजग राहायला हवे.”मंगलमूर्ती गणराया सर्व काही सावरून घेईल आणि कष्टाने पिकवलेल्या शेतात घामाचा घास नक्कीच भरभरून देईल,” हा अढळ विश्वास उराशी बाळगत बळीराजा गणरायाला संकटाशी सामना करण्याचे बळ देण्याचे अन संकटमुक्त करण्याचे साकडे घालत आहे.












