मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत असल्याने या पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
महाराष्ट्रातील औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांवरील विद्यमान सदस्यांमध्ये चव्हाण सतीश भानुदासराव, अरुण गणपती लाड, अभिजित गोविंदराव वंजारी, सरनाईक किरण रामराव आणि जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे.
निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे.
२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.












