उल्लास नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत असगोली नं.१ शाळेतर्फे गणेशोत्सवामध्ये जनजागृती

गुहागर प्रतिनिधी :
उल्हास नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत गुहागर केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली नंबर एक शाळेतर्फे गणेशोत्सवामध्ये साक्षरता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जनजागृती साठी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर तयार करण्यात आलेले होते. कोकणामध्ये मुंबई निवासी चाकरमणी गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने गावी येत असतात .अशावेळी नव साक्षर यांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळावी व साक्षरतेचे एक पोषक वातावरण निर्माण व्हावे तसेच गावामध्ये कोणीही असाक्षर राहू नये म्हणून या उद्देशाने जिल्हा शिक्षणाधिकारी योजना आदरणीय किरण लोहार साहेब, गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, यांनी उपक्रम राबवण्यासाठी आवाहन केले होते.केंद्रप्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध असे साक्षरता जनजागृती फेरीचे आयोजन केले. सदर फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .असगोली गावातील सर्व नवसाक्षरांपर्यंत यानिमित्ताने पोहोचता आले. त्यावेळी रोहिणी गुरव, स्नेहा सकपाळ, दीपक गुरव, देवेंद्र गुरव ,दिव्यता पालशेतकर, सानवी कावणकर, तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप पवार, संदीप गुरव ,विनया गुरव यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते युवक या रॅलीमध्ये सहभागी झाल्याने नवसाक्षरांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळाली. गुहागर केंद्रामध्ये गणेशोत्सव काळामध्ये साक्षरता जनजागृती कार्यक्रम सर्व शाळांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे आयोजनाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.