विसर्जन घाट दुरुस्तीला तात्काळ मंजुरीचे आश्वासन
चिपळूण (प्रतिनिधी) : बोलायचे कमी आणि कामातून दाखवायचे अधिक, या भूमिकेतून भिलेमधलीवाडीतील विकासकामांना सातत्याने पाठबळ देणारे आमदार शेखर निकम यांचा ग्रामस्थांनी कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. वाडीतील नूतन सभागृहाचे काम पूर्ण करून दिल्यानंतर आ. निकम यांनी स्वतः सभागृहाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत विकासकामांसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मधलीवाडीतील गणपती विसर्जन घाटाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा शब्द आमदार निकम यांनी यावेळी दिला.
घाट दुरुस्तीला तात्काळ मंजुरी देण्यासह रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि अन्य प्रस्तावित कामे वर्षभरात पूर्ण करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. भिले कालुस्ते खारभूमी विकास योजनेसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भिले गावातील विविध लहान-मोठ्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गावाच्या गरजा लक्षात घेऊन यापुढेही विकासकामे सुरूच ठेवणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणाचा खाडीपट्ट्यातील आंबा-काजू बागायतींवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. या परिणामांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाशी चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार निकम यांनी दिली. ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मण रेवाळे यांनी प्रास्ताविकातून मधलीवाडीच्या विकासाचा आढावा घेतला. झालेली कामे, सुरू असलेली कामे आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती देताना त्यांनी आमदार निकम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग माळी, उपसरपंच उमेश सकपाळ, केतकीचे उपसरपंच प्रदीप घाडगे, प्रभाकर सैतवडेकर, विजय दिवेकर, लक्ष्मण रेवाळे, प्रशांत ठाकूर, भिले कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष सुरेश भुवड, भिले कुणबी समाज स्थानिक मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताराम घरवे, भिले देवस्थान अध्यक्ष दत्ताराम नवेले, प्रतिष्ठित ग्रामस्थ मनोहर भुवड यांच्यासह ग्रामस्थ सोनू आदवडे, पांडुरंग हुमणे, दत्ताराम नवेले, दत्ताराम हुमणे, कृष्णा आदवडे, सचिन रेवाळे, सिताराम रेवाळे, महेश रेवाळे, नितिन रांगळे, हरि रेवाळे, विकास नवेले, सिताराम नवेले, रमेश कदम, सुनिल कदम, प्रकाश कदम, चंद्रकांत कदम, प्रसिद नवेले, सुनिल रेवाळे, विजय रेवाळे उपस्थित होते. राकेश आदवडे यांनी सूत्रसंचालन केले.












