कोळकेवाडीतील चारजणांवर गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण येथील उक्ताड परिसरात भररस्त्यात दुचाकी अडवून जावयाला आणि मध्यस्थी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सासऱ्याला बेदम मारहाण करत हातातील कड्याने डोळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाले असून, चिपळूण पोलिसांनी कोळकेवाडी येथील चार संशयित तरुणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उक्ताड येथील कालभैरव मंदिराजवळ राहणारे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सुभाष बाजी लोटेकर (६४), त्यांचे जावई समीर काकडे, ड्रायव्हर कृष्णा काळे आणि क्लिनर ओंकार चव्हाण हे २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास कालभैरव मंदिर ते गणेश मंदिर रस्त्याने जावयांच्या गाडीकडे चालत जात होते. ते रामभाऊ गोरीवले यांच्या घराजवळ पोहोचले असता, उक्ताडच्या दिशेने एका ॲक्टिव्हा (क्रमांक एम.एच. ०८ बी.ए. ४३७८) आणि बुलेट मोटरसायकलवरून (क्रमांक एम.एच. १२ एक्स.एस. ६१६४) चार तरुण आले. त्यांनी अचानक फिर्यादींचा रस्ता अडवून वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर संशयित आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे आणि आर्यन अनिल शिंदे यांनी फिर्यादींचे जावई समीर काकडे यांना हाताच्या चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या जावयाला वाचवण्यासाठी ६४ वर्षीय सुभाष लोटेकर मध्ये पडले असता, चौथा संशयित नितीन रामचंद्र शेळके याने लोटेकर यांच्या जोरात कानाखाली मारून त्यांना बाजूला ढकलून दिले. त्यानंतर आरोपींनी जावई समीर काकडे यांच्या डाव्या डोळ्याजवळ हातातील लोखंडी कड्याने जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच सर्वांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले असून, सुभाष लोटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (१), १२६ (२), ३५२, ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये कोळकेवाडी येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












