३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन
भजनी मंडळांना दिंड्यांसह सहभागी होण्याचे आवाहन
शिरगाव (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाची सांगता होताच ग्रामस्थांना वेध लागतात ते अखंड हरिनाम सप्ताहाचे! ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचे अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात बुधवार, ३० सप्टेंबर ते मंगळवार, ६ ऑक्टोबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात येते. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघतो. या हरिनाम सप्ताहात गावातील विविध वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. सप्ताहाचे आठ प्रहरांत नियोजन असून, प्रत्येक प्रहर तीन तासांचा आहे. प्रत्येक प्रहराची भजनसेवा संबंधित वाड्यातील ग्रामस्थांना देण्यात आली आहे. त्यामुळे सातही दिवस मंदिर परिसरात अखंड हरिनामाचा गजर घुमत राहून गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
या सप्ताहात भजनी मंडळांनी दिंड्यांसह सहभागी होऊन हरिनामाचा गजर करावा आणि सप्ताहाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी, १२/५ मानकरी व देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.












