मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात वृक्ष संवर्धनाचा संदेश
सावंतवाडी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेवर आधारित एक महत्त्वपूर्ण उपक्रम काल गुरुवारी मळगाव येथील श्री देव मायापूर्वचारी मंदिर परिसरात राबविण्यात आला. या निमित्ताने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास चिंताजनक असून, तो रोखण्यासाठी शासन विविध माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे आवाहन करत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत आणि सध्याच्या बेसुमार वृक्षतोडीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, गजानन उर्फ प्रकाश राऊळ यांच्या संकल्पनेतून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या मूर्ती पुनः प्रतिष्ठापना मुख्य सोहळ्यानिमित्त एकीकडे पाषाणांची प्रतिष्ठापना सुरू असतानाच, दुसरीकडे मंदिर परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाच्या रक्षणाचा संदेश दिला गेला.
यावेळी १२ पोफळीची आणि ४ माडाची झाडे अशी एकूण १६ वृक्षे लावण्यात आली. या उपक्रमाप्रसंगी प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजेंद्र परब, सोनुर्ली येथील नंदू गावकर, गजानन राऊळ, बाळा गावकर, निरवडेचे माजी सरपंच सदा गावडे, विवेक नार्वेकर, महेश पंतवालावलकर, पांडुरंग राऊळ, सहदेव राऊळ, सुनील राऊळ, ऋषिकेश राऊळ, रामकृष्ण पंतवालावलकर, श्रीकृष्ण गावकर, दीपक जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वृक्षारोपण सोहळ्याने धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक दायित्वाचे एक आदर्श उदाहरण घालून दिले.













