सिंधुदुर्ग पोलीस दलातील सफाई कामगारांच्या वारसांना शासन लवकरच न्याय देणार : पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली मंत्रालयात भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने शासकीय सेवेत तातडीने सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन केले . यावर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गृह विभागाशी या प्रकरणात विशेष लक्ष घालून या तिन्ही वारसांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल,असे स्पष्ट केले.

लाड समितीच्या शिफारशी, मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचा स्पष्ट निर्णय झालेला आहे. तथापि, वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून खुल्या प्रवर्गातील पात्र वारसांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.

या प्रलंबित प्रकरणात बांदा येथील सौ. अंजली अभिनय बांदेकर, सावंतवाडी येथील श्री. काशिनाथ रमेश नाईक आणि कुडाळ येथील सौ. भाग्यश्री रामचंद्र काळप या तीन वारसांचा समावेश असून, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाकडे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधले. जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री म्हणून आपण या संवेदनशील प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर ना. राणे यांनी गृह विभागामार्फत या तिघांनाही न्याय मिळेल.

तसेच खा. नारायण राणे यांची त्यांच्या मुंबई कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली.
या दोन्ही महत्त्वपूर्ण भेटींच्या वेळी श्री. सुरेंद्र भोसले व श्री. रोहित सुर्वे उपस्थित होते.