कुंपणच शेत खातंय तेव्हा…: दोडामार्ग महावितरणचा भोंगळ कारभार उघड!

बांधकाम व्यावसायिक अन् गरिबांना वेगवेगळा न्याय? दीड वर्षांपासून बिल न आकारल्याने नगरसेवक आक्रमक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

दोडामार्ग :सुहास देसाई 

तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य गरीब ग्राहकाचे वीजबिल थोडेसे जरी थकले तरी तत्काळ वीजजोडणी तोडण्यासाठी धावणाऱ्या महावितरणच्या पक्षपाती आणि भोंगळ कारभारावर दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे आणि नगरसेवक रामचंद्र (पांडुरंग) ठाकूर अत्यंत आक्रमक झाले आहेत. दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला गेल्या दीड वर्षांपासून वीजपुरवठा सुरू असूनही बिलाची आकारणीच झाली नसल्याचा गंभीर प्रकार त्यांनी उघडकीस आणला. यासंदर्भात त्यांनी थेट महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

‘गरिबांसाठी एक नियम अन् बिल्डरांसाठी दुसरा?’

नगरसेवक नानचे व ठाकूर यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. “गरीब ग्राहकाचे बिल थकल्यास लगेच कनेक्शन कापले जाते, मग बांधकाम व्यावसायिक दीड वर्षे मोफत वीज वापरत असताना ही तत्परता कुठे गेली? गरिबांना कायद्याचा धाक दाखवायचा आणि मोठ्या लोकांसाठी नियम गुंडाळून ठेवायचे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

यावेळी अधिकाऱ्यांकडे संबंधित इमारतीच्या वीजबिलांची नोंद व कागदपत्रे मागितली असता, त्यांना बिल सादर करता आले नाही. यांची

सखोल चौकशी अन् गुन्हे दाखल करण्याची मागणी

बांधकामाच्या काळात लोखंड कापणे, पाणी मारणे व यंत्रसामग्री चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. त्यामुळे या दीड वर्षांच्या काळात नेमकी किती वीज वापरली गेली, याचे मूळ रीडिंग तपासून महावितरणच्या संभाव्य आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी व्हावी. तसेच, यात अनधिकृत वीजवापर किंवा वीज चोरीस सहकार्य झाल्याचे निष्पन्न झाल्यास जबाबदार अधिकारी व संबंधितांवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करून आर्थिक नुकसान वसूल करावे, अशी जोरदार मागणी नानचे आणि ठाकूर यांनी केली.

पडवे-माजगाव येथील झाडे तोडल्याचा अन् पोल उभारणीचा प्रश्न

यावेळी पडवे-माजगाव परिसरातील खासगी जमिनीतील झाडे तोडून वीजखांब उभारल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. ठेकेदाराने जमीनमालकांची झाडे तोडून पोल उभारले; मात्र अद्याप कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही. या बाधितांना तातडीने भरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संतोष नानचे यांनी केली.

याबाबत

“प्राप्त तक्रारींची नोंद घेतली असून मी स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करेन आणि वस्तुस्थिती तपासून आवश्यक ती कारवाई केली जाईल. तसेच वाढीव अथवा चुकीच्या बिलांबाबतच्या तक्रारी तपासून योग्य त्या दुरुस्त्या केल्या जातील.”असे भाऊसाहेब साळुंखे उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले

 

 

 

‘कुंपणच शेत खातंय’ अशी स्थिती निर्माण झालेल्या दोडामार्गमधील या कथित वीज चोरी व अनियमिततेप्रकरणी वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी होणार का? निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.