कोदवली धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने योग्य सेवा सुविधा पुरवाव्यात
राजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
राजापूर (प्रतिनिधी): शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरण क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करताना या धरण क्षेत्रात सीसीटीव्ही बसविणे व हे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहिर करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
तर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन वाहन खरेदी करणे  व पाणीसाठयाच्या नियोजनासाठी बंधारे बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली  बॅ. नाथ पै. सभागृहात झाली. यावेळी कोदवली धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेताना हे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करून त्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना कळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत राजापूर नगरपरिषदेमार्फत शहरातील घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्था नियमित व प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून सध्या उपलब्ध वाहने खुप वर्ष जूनी असलेने वारंवार नादुरुस्त होत असलेने त्यांची क्षमता व कार्यस्थिती लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनाच्या दैनंदिन कामकाजासाठी डंपर -२, ट्रॅक्टर विथ ट्रॉली, बँक हो लोडर (जे.सी.बी), या वाहनांची आवश्यकता आहे. घनकचरा संकलनाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना नियमित सेवा उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छता विषयक कामकाज सुरळीत ठेवणे यासाठी जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांच्यामार्फत अथवा अन्य उपलब्ध होणाऱ्या निधीतून वाहने खरेदी करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली. तर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने कोदवली धरण तसेच आंबेवाडी जॅकवेल परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळी कालावधीत पाण्याची पातळी कमी झाल्यास नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी अडविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
आठवडा बाजाराची वेळ सायंकाळी ७ पर्यंत निश्चित
शहरात दर गुरूवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात बाहेरून मोठया प्रमाणावर व्यापारी येतात, मात्र बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांनी केलेला कचरा व साहित्याची विल्हेवाट स्वता लावायची आहे असे नगर परिषदेने निश्चित केलेले असतानाही अनेक व्यापारी हे कचरा जागेवरच टाकून जातात, तो कचरा साफ करण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांना त्या दिवशी रात्री एक ते दिड वाजेपर्यंत काम करावे लागते. याबाबत सभागृहात पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी मुद्दा उपस्थित कय्न आठवडा बाजाराची वेळ ही सायंकाळी ७ निश्चित करावी, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना पुढे वेळेत स्वच्छता करणे शक्य होईल. व जे व्यापारी आपला कचरा उचलून त्याची स्वता विल्हेवाट लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी असे सभागृहात नमुद केले. यावर संपुर्ण सभागृहाने एकमताने सहमती दर्शवत आजपासूनच याची अंमलबजावणी करा, व्यापाऱ्यांना नोटीस काढून कळवा असे सांगितले. यावर तात्काळ अंमलबजावणीचे आदेश नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी दिले.
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर योग्य सेवा सुविधा पुरवा- नगराध्यक्षा एड. खलिफे
शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील अनेक भागातील गणपतींचे गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात तसेच गणेशघाटांवर स्वच्छतेबरोबरच पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी, विसर्जनाबाबत सुयोग्य असे नियोजन करावे अशा सुचना नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी दिल्या.
सभागृहात विविध विषयांवर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, गटनेते एड. जमिर खलिफे, एड. राहुल तांबे यांसह सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीने कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी माहिती दिली.