लांजा ब्रेकिंग न्यूज
कुरंग, रिंगणे आणि कोंडगे ग्रामस्थांनी वाहनाने पाठलाग करून मोटार सायकलवरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले
संतोष कोत्रे
लांजा-: बंद कर फोडण्याचा प्रयत्न करणारे बीड जिल्ह्यातील सराईत अट्टल चोरटे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडले गेले आहेत. कुरंग, रिंगणे आणि कोंडगे येथील ग्रामस्थांनी वेळीच सतर्कता दाखवत मोटार सायकल घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराई चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता रिंगणे येथे घडली
याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथील संतोष आयरे यांचे घर असून ते मुंबईला राहतात. त्यामुळे घर बंद असते. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास होंडा शाईन या दुचाकीवरून आलेल्या संजय उर्फ मोहन निकाजा भोसले (वय २१, राहणार तालुका आष्टी जिल्हा बीड) आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले (वय २५, राहणार आष्टी जिल्हा बीड) या
दोघा अट्टल चोरट्यांनी पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर तसेच कटर आदिंच्या सहाय्याने संतोष श्रीधर आयरे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.
ही बाब शेजारी राहणारा जयेश संदीप आयरे (वय २६, राहणार रिंगणे) याच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर या दोघा चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेल्या होंडा शाइन या दुचाकीवरून कारवली पार्सल मार्गे पाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतची माहिती जयेश आयरे यांनी रिंगणे गावचे सरपंच संजय आयरे यांना दिली. संजय आयरे यांनी याबाबतची माहिती कोंडगे येथील महेश विश्वासराव, कुरंग येथील गणेश सुर्वे यांना दिली. या सर्वांनी आपल्या गाडीने या अट्टल चोरट्यांचा पाठलाग केला.
नव्याने झालेल्या झर्ये कारवली या रस्त्यावर ग्रामस्थांनी या अट्टल चोरट्यांना पकडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे दोघे अट्टल आणि सराई चोरटे ग्रामस्थांनी पकडले त्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची होंडा शाइन मोटरसायकल तसेच चोरीच्या घटनेत वापरण्यात आलेला मोठा पोपट पाना, स्कू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, हँडग्लोज, कटर ,मास्क आदी साहित्य देखील जप्त केले आहे. या दोघा सराईत चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेलार हे करत आहेत.











