देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख तसेच पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव वसंत उजगावकर यांचे आज सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कडवई परिसरावर शोककळा पसरली असून जनसामान्यांच्या अडचणीच्या काळात धावून जाणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा एक जिव्हाळ्याचा ‘आपला माणूस’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून वसंत उजगावकर यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला होता. या शाखेच्या माध्यमातून पक्षीय कार्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला होता. शाखेच्या उद्घाटनावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि जनसंपर्काचे विशेष कौतुक केले होते.
गावात कोणत्याही सामाजिक उपक्रमाची हाक आली, मदतीची गरज निर्माण झाली किंवा एखाद्या कुटुंबावर संकट आले, की वसंत उजगावकर यांची उपस्थिती हमखास असायची. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देत त्यांनी सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने कडवई परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. “जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला आमचा माणूस आता देवाची सेवा करण्यासाठी गेला,” अशा भावनिक शब्दांत ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांच्या मनमिळावू स्वभावाच्या, मदतीला धावून जाणाऱ्या वृत्तीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या आठवणींना उजाळा देत ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.












