सावंतवाडी : पारंपरिक शास्त्रीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आरोस येथील सचिन प्रमोद पांगम यांनी पखवाज अलंकार परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांनी यश मिळवले.
सचिन पांगम हे तालविश्व संगीत विद्यालयाचे विद्यार्थी असून गेल्या ११ वर्षांपासून ते पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. गुरुवर्य मनीष तांबोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पखवाज वादन आणि साथसंगतीचा सातत्याने अभ्यास केला. याशिवाय गुरुवर्य नीलेश पेडणेकर तसेच कै. पं. गोविंद भिलारे गुरुजी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.
पखवाज वादनातील दीर्घकाळची साधना, नियमित सराव आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून सचिन यांनी हे यश संपादन केले. अलंकार परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल तालविश्व संगीत विद्यालयाचे संचालक नीलेश पेडणेकर, माऊली संगीत विद्यालयाचे संचालक वैभव परब आणि गुरुकुल संगीत विद्यालयाचे संचालक संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.












