घनकचरा प्रकल्पाचे २ महत्त्वाचे ठराव फेटाळले
दोडामार्ग:प्रतिनिधी
साटेली भेडशी रोडवरील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ४१ लाख रुपयांचे बिल काढल्याच्या मुद्द्यावरून दोडामार्ग नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांनी विकासकामांचा दर्जा, निधीचा वापर, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि ठेकेदारांच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेतल्याने ही सभा अत्यंत वादळी ठरली.
४१ लाखांचे बिल आणि ८० टक्के आगाऊ रक्कमेवरून रान पेटले
तलाव सुशोभीकरणाच्या कामाचा दर्जा, प्रत्यक्ष झालेला खर्च आणि देयकांची प्रक्रिया यावर माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी तीव्र सवाल उपस्थित केले. या संपूर्ण प्रक्रियेची आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय, नगरपंचायत इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला सुमारे ८० टक्के रक्कम कशाच्या आधारे अदा करण्यात आली, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. या सर्व प्रकारावर प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
त्याचप्रमाणे, नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रत्यक्ष कामावर न पाठवता कार्यालयात बसवून ठेवले जात असल्याचा प्रकारही उघडकीस आला. संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पीएफच्या वर्षभरातील व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी केली. प्रशासकीय आशीर्वादाशिवाय असा प्रकार शक्य नाही, असा आरोप करत दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली.
घनकचरा प्रकल्पावरील दोन्ही ठराव फेटाळले
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागी शेड उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, यापूर्वी या प्रकल्पावर लाखो रुपये खर्च करूनही नगरपंचायतीला किंवा नागरिकांना काय फायदा झाला? असा प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
तसेच, याच ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचा दुसरा प्रस्तावही नगरसेवकांनी फेटाळला. स्मशानभूमी परिसरातील संरक्षण भिंतीच्या निकृष्ट कामाचे उदाहरण देत, नव्या कामाची गरज आणि गुणवत्ता सिद्ध होत नाही तोपर्यंत निधी मंजूर केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी घेतली.
अनावश्यक बांधकामांपेक्षा नागरिकांना स्वच्छ व पुरेशा पाणीपुरवठ्याची सुविधा देण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केली. तसेच शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा उभारण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
अधिकारी गैरहजर असताना काही नगरसेवकच कामांची पाहणी करत असल्याबद्दल रामचंद्र ठाकूर यांनी आक्षेप नोंदवला.
तलावाला ‘भेडशी तलाव’ ऐवजी ‘कलमठाणा’ किंवा ‘कसईनाथ’ असे नाव देण्याची मागणी नगरसेवक रामराव गावकर यांनी केली.
भेडशी मुख्य रस्त्यापासून रामदास गवस यांच्या घरापर्यंतच्या खडीकरण व साकव बांधकामाच्या प्रस्तावाला, जागेचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतरच मंजुरी दिली जाईल, असे सभाध्यक्ष देविदास गवस यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण सभेला नगराध्यक्ष चेतन चव्हाण (कामानिमित्त मुंबई) आणि मुख्याधिकारी एस.आय.आर. (बैठकीनिमित्त ओरोस) अनुपस्थित होते.
सभेचे अध्यक्षपद उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी भूषवले. या सभेला नगरसेविका संजना म्हावळणकर, स्वराली गवस, ज्योती जाधव, सोनल म्हावळणकर, वासंती मयेकर आणि नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, रामराव गावकर, रामचंद्र मणेरीकर, राजेश प्रसादी, नितीन मणेरीकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने लेखापाल आनंद परब, नगर अभियंता अभिषेक नेमाणे, स्थापत्य अभियंता प्रबोधन मठकर, स्वच्छता निरीक्षक विवेक कांबळे, शहर समन्वयक सिद्धेश शेगले व इतर कर्मचारी उपस्थित होते.









