कोकिसरे मतदारसंघातील सात गावात सौ. रावराणे यांनी केली शेतीची पाहणी
प्रत्येक गावात पाणीटंचाईचा घेतला आढावा
जलजीवनची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : रावराणे यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
वैभववाडी l प्रतिनिधी :शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढवले असून, करपलेल्या पिकांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, या संकटाला शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभे आहोत. एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रोहन रावराणे यांनी दिले.
कोकिसरे मतदारसंघातील उंबर्डे, कुसूर, कुंभवडे, करूळ, कोकिसरे, नाधवडे व नापणे या सात गावांमध्ये जाऊन श्रावणी रावराणे यांनी करपलेल्या भातशेतीसह नाचणी व भुईमूग पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धीर देत, आपण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाल्यानंतर ट्रिगर-१च्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी करूळ येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीनिहाय पाणीटंचाईच्या मंजूर तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. मंजूर कामे तातडीने सुरू करून प्रलंबित कामेही जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना श्रावणी रावराणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
करूळ गावातील जलजीवन मिशनची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, तसेच जलसंधारणाच्या दुरुस्तीची कामेही वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीमती नरेवडीकर व इंगवले यांना दिल्या. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करूळ गावासाठी नव्याने पाच विंधन विहिरी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली. ग्रामपंचायत व लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधारे व कच्चे बंधारे उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दरम्यान, करूळ येथील विश्वास सिताराम सावंत यांच्या शेतात जाऊन श्रावणी रावराणे व पदाधिकाऱ्यांनी भात व नाचणी पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक ती मदत व पाठबळ देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच भास्कर सावंत, ग्रामपंचायत पाणीपुरवठा अभियंता श्रीमती नरेवडीकर, कृषी विस्तार अधिकारी प्रवीण कुडतरकर, जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव यांनी मानले.












