शिरगाव-शेवरे ओहोळावर ग्रामस्थांनी उभारला कच्चा बंधारा

संदीप साटम यांच्या पुढाकारातून जलसंवर्धनाचा उपक्रम

आणखी आठ ते दहा कच्चे बंधारे उभारण्याचा ग्रामस्थांचा मानस

शिरगाव (प्रतिनिधी) : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शिरगाववासीयांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या पुढाकारातून तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या लोकसहभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शिरगाव-शेवरे ओहोळावर श्रमदानातून कच्चा बंधारा उभारला.

ओहोळातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने एकत्र येत या कामात सहभागी झाले. गावातील विविध ओहोळांवर आणखी आठ ते दहा कच्चे बंधारे उभारण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात संदीप साटम, माधव साटम, राजेंद्र शेट्ये, मिलिंद साटम, सुधीर साटम, बापू खरात, मेघना साटम, रेखा शिरोडकर, अनिल घाडी, योगेश तावडे, प्रशांत शिरोडकर, स्वप्नील वायगणकर, राकेश साटम, ज्ञानेश्वर, स्वप्नील हिंदळेकर, विजय साटम, कदम सर व संतोष तावडे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले.