राजरोसपणे होत असलेल्या गावठी दारूच्या विक्रीला अभय कोणाचे? लोकांचा सवाल
लांजा(प्रतिनिधी): लांजा शहर परिसरामध्ये खुलेआमपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या गावठी दारू विक्रीला अभय कोणाचे? असा सवाल लोकांतून व्यक्त केला जात आहे.
लांजा तालुक्याच्या विविध ग्रामीण भागामध्ये विनापरवाना देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्यांवर लांजा पोलिसांनी चांगलीच जरब बसवली आहे. मात्र लांजा शहर परिसरात तीन ते चार ठिकाणी खुलेआमपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री केली जात आहे.
गावठी दारूच्या या व्यसनामुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त होत आहेत. तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ लागली असल्याने दारु विक्री बंद होणे तसेच अशा दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
लांजा शहरामध्ये तालुक्यातीलच काही नजीकच्या गावातून गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणली जाते. त्यामुळे गावठी दारू बनवण्याची पाळेमुळे खणून काढून प्रथम त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास दारू विक्रीसाठी शहरामध्ये येणार नाही. मात्र सद्यस्थितीत लांजा शहरामध्ये तीन ते चार ठिकाणी बिनबोभाटपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री केली जाते आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ही कारवाई करताना संसार उध्वस्त करणारे दारु धंदे कायमस्वरुपी बंद करावेत अशी मागणी होत आहे.










