‘महाराणी ताराबाई भोसले’ विषयावरील निबंधासाठी मिळविला बहुमान
कणकवली : जवाहर नवोदय विद्यालय, सावंतवाडी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या कु. आरोही श्रीकांत हंकारे हिने लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी ‘महाराणी ताराबाई भोसले’ हा विषय देण्यात आला होता. राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आरोही हिने विषयाचा अभ्यासपूर्ण व प्रभावी पद्धतीने वेध घेत निबंधाची मांडणी केली. तिच्या या लेखनाची दखल घेत तिला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक देण्यात आला.
या यशाबद्दल आरोहीचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरव करण्यात आला. लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत बांकर तसेच अशोक दुधारे यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
आरोहीला या स्पर्धेसाठी तिचे पालक तसेच प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे आरोहीने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
आरोहीच्या या यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच परिसरातून अभिनंदन होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.










