चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील पेठमाप परिसरातील विश्वदर्शन केबलजवळ गुरुवारी, दि. १ ऑक्टोबर रोजी लोकवस्तीत मगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. स्थानिक नागरिक रूपेश पवार यांनी याबाबत तत्काळ वन विभागाला माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या पथकाने सुरक्षित रेस्क्यू करून मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पेठमाप परिसरात मगर आढळून आली. यानंतर येथील नागरिकांनी याची माहिती चिपळूण वन विभागाला दिली. या घटनेची वन विभागाने दखल घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी कृष्णा इरमले तसेच बचाव पथकातील अजय बडदे आणि अथर्व घाग यांनी घटनास्थळी पोहोचून मगरीची पाहणी केली.
लोकवस्तीचा परिसर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच मगरीला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेत वन विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मगरीचे सुरक्षित रेस्क्यू केले. रेस्क्यू केल्यानंतर मगरीची प्रकृती तपासण्यात आली. तिची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
वन विभागाच्या पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे लोकवस्तीतील संभाव्य धोका टळला. मगर आढळून आल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वन विभागाला माहिती देणे आवश्यक असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले.
सदर बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियांका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण श्री. एस. एस. खान तसेच वनपाल, चिपळूण श्री. एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.













