सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव २०२६च्या अंतिम फेरीत सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (ॲप्लाइड आर्ट)च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल नांदगावकर याने ‘ऑन-द-स्पॉट पेंटिंग’ प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी ऋतुजा सुतार हिने ‘कोलाज’ प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तसेच तृतीय वर्षाचा विद्यार्थी प्रसाद खोरागडे याने ‘रांगोळी’ प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालयाच्या कलात्मक गुणवत्ता आणि सर्जनशीलतेची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन रमेश भाट, प्राचार्य प्रा. उदय वेले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालय परिवाराने सहभागी विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष रमेश भाट व प्राचार्य प्रा. उदय वेले यांनीही कौतुक केले.










