जैतापूर वार्ताहर : आगामी नवरात्रौत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे सागरी पोलीस ठाण्यात कार्यक्षेत्रातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
उत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सण साजरा करताना कोणीही आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत, ज्यामुळे सामाजिक अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल; तसेच अंतर्गत वादविवाद पूर्णपणे टाळून एकोप्याने उत्सव साजरा करावा, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या. सद्यस्थितीत वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती निर्माण करणे गरजेचे असून, सोशल मीडियाचा वापर प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने करावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाटे हा संवेदनशील सागरी किनारपट्टीचा परिसर असल्याने स्थानिक मंडळे आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सजग राहावे, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असेही यावेळी नमूद करण्यात आले. तरुणाईला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थांच्या विरोधात तसेच व्यसनाधीनतेविरुद्धच्या मोहिमेत मंडळांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याशिवाय आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध पोलीस सेवांची माहिती देऊन ‘डायल ११२’ या तत्पर हेल्पलाईन क्रमांकाचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. मंडप परिसरात सीसीटीव्ही, स्वयंसेवकांची नेमणूक आणि सुरक्षाविषयक आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत पोलीस प्रशासनाकडून सर्व उपस्थितांना नवरात्रौत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीस परिसरातील विविध मंडळांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या नाटे सागरी पोलीस ठाण्यात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न; सायबर सुरक्षा व जनजागृतीचे...













