सावंतवाडी । प्रतिनिधी:भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानुसार सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. सावंतवाडी शहराच्या सीमेवर असलेल्या झिरंगवाडी, गरड आणि माजगावसह आसपासच्या विविध गावांतील बऱ्याच शेतकऱ्यांची भातशेती पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जळालेल्या भातशेतीची आणि बागायतींची बारकाईने पाहणी केली. पावसाने मारलेल्या ओढीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने स्थानिक शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या कठीण आणि संकटसमयी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, झालेल्या सर्व नुकसानीचा प्रशासनाकडून वस्तुनिष्ठ पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना योग्य व भरीव भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विजय साटेलकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













