तर संबंधित महिलेला तडीपार करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार ; पोलीस निरीक्षकांचे आश्वासन
सावंतवाडी : सांगेली सावरवाडसह कलंबिस्त गावात महिलेकडून केला जाणारा गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीचा धंदा कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी शेकडो महिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडले. यापुर्वी पोलीसांचे लक्ष वेधल्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊनही हा प्रकार थांबत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगितले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपणाला यात न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत उपोषणाला पाठिंबा दिला. तर संबंधित महिलेला तडीपार करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार असून वेळप्रसंगी मी स्वतः येऊन कारवाई करेन, अशी ग्वाही पोलीस निरीक्षकांनी दिली. यानंतर उपोषणकर्त्या महिलांकडून दुपारच्या सुमारास उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषणकर्त्या महिला म्हणाल्या,
गावातील फातिमा फर्नांडिस व अलिशा रॉड्रिक्स यांच्याकडून कलंबिस्त, सांगेली, वेर्ले, शिरशिंगे, ओवळीये आदी गावात गोवा बनावटीची अवैध दारू पुरवली जाते. त्यामुळे तरूण पिढी देशोधडीला लागली असून अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. तक्रार करणाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंतची मजल संबंधितांची होत आहे. पुरुष मंडळीवर कोणत्याही पातळीवर जाऊन आरोप त्या करू शकतात. महिला असल्याचा फायदा उठवत हे प्रकार होत आहेत. तसेच संबंधितांकडून आम्हाला घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली जात असून आपलं कोणी काहीही वाकड करू शकत नाही अशी धमकी दिली जाते. पोलीस कारवाईनंतर देखील काही दिवसातच पुन्हा अवैध धंदा सुरू केला जातो. तसेच कुडतरकर टेंब येथील वैशाली कुडतरकर या महिलेकडून गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय आपल्या घरात केला जात असल्याची लेखी तक्रार यावेळी महिलांनी केली. अवैध दारू विक्रीचा हा धंदा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करत भरारी महिला ग्रामसंघ सांगेली सावरवाड तसेच पंचक्रोशीतील महिलांनी आमरण उपोषण छेडले होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात लक्ष घालत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. या प्रकरांमुळे आज गावातील अनेकांच्या बायका घर सोडून गेल्यात. दारूच्या नशेच्या आहारी जाऊन काहीचे नवरे दगावले असून महिलांना गावात फिरण मुश्किल होऊन बसलं आहे. लहान मुलं नशेच्या आहारी जात आहेत. त्यामुळे विक्री करणाऱ्या या लोकांवर कडक कारवाई करावी, संबंधित महिलेला हद्दपार करावे अशी मागणी उपस्थितांनी केली.
दरम्यान, अवैध धंदे बंद करण्यासाठी पालकमंत्री यांनी भूमिका घेतलेली असताना पोलिस प्रशासनाला आवश्यक आदेश देत उपोषणकर्त्या महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदीप निंबाळकर यांनी केली. यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून देखील उपोषणाला पाठिंबा देत आम. दीपक केसरकर यांचे देखील लक्ष वेधणार असल्याचे ग्वाही दिली. तर महिलांना कोणाकडून दमदाटी, मारहाण होत असल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी दिला.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपोषणस्थळी भेट देत महिलांशी चर्चा केली. पोलीस ठाण्यातून वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांचेही लक्ष वेधले असून तक्रार असलेल्या एका महिले विरोधात तडीपारीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. पोलीसांच्या कारवाईमुळे आधीपेक्षा बरंच प्रमाण आता कमी झालं असून माझा संपर्क क्रमांक महिलांना देतो. वेळप्रसंगी मी स्वतः येऊन कारवाई करेन, असा शब्द त्यांनी दिला. यावेळी तडीपारीसाठीचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा पुढील कार्यवाही करण्यासाठी लोकप्रतिनिधींच लक्ष वेधू असे आश्वासन शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्ता महिलांकडून उपोषण स्थगित करण्यात आले. तसेच गावात महिला पोलिस नेमण्यात यावा अशीही विनंती महिलांनी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, गुरू मठकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सौ. आरवारी, सरपंच देवयानी पवार, निलेश सावंत, तेजस्वीनी कुडतरकर, स्नेहा कुडतरकर, सुप्रिया मडगावकर, वंदना कुडतरकर, स्मिता म्हाडगूत आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.











