कुडाळचे तिघे संशयित ताब्यात
बांदा : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीरपणे आणि निर्दयीपणे बैलांची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. कत्तलीच्या उद्देशाने गोव्याकडे वाहनातून तीन बैलांची वाहतूक केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार १ ऑक्टोबर रोजी बांदा पोलीस चेकपोस्टवर पोलीस हवालदार विलास पांडुरंग भोगले आणि त्यांचे सहकारी नाकाबंदी करत होते. दरम्यान, संशयित टेम्पो येताना दिसल्याने पोलिसांनी चालकाला हाताचा इशारा करून थांबण्याची सूचना केली. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशार्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो पुढे नेला. पोलिसांनी पाठलाग करून वाहनाची पाहणी केली असता त्यात तीन बैल अत्यंत दाटीवाटीने, दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळून आले. प्राण्यांच्या चारा आणि पाण्याच्या कोणत्याही व्यवस्थेशिवाय त्यांची वाहतूक केली जात होती.
तपासात संशयित अमीर साहिल निसार शेख याने सदर बैल रमजान इकबाल शेख याच्या टेम्पोमध्ये भरून आदनान दिलदार काजरेकर यांच्या मदतीने म्हापसा (गोवा) येथे कत्तलीसाठी विक्रीकरिता नेण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी रमजान इकबाल शेख (वय २५, रा. मशिद मोहल्ला, कवीलकाटे, ता. कुडाळ), आदनान दिलदार काजरेकर (वय २४, रा. मशिद मोहल्ला, रेल्वे स्टेशनजवळ, ता. कुडाळ) आणि अमीर साहिल निसार शेख (वय ३०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक करत आहेत.













