रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू 

सोनुर्ली येथील रेल्वे ट्रॅकजवळील घटना

सावंतवाडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

सावंतवाडी : 

मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर सोनुर्ली होळीचा खुर्द येथे रेल्वेतून खाली पडल्याने एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास सोनुर्ली होळीचा खुर्द येथील मुंबई-गोवा रेल्वे ट्रॅकच्या उजव्या बाजूला असलेल्या वहाळीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. चालत्या रेल्वेतून प्रवास करताना या इसमाचा टी-शर्ट झाडीत अडकल्याने तो खाली फेकला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत रोणापाल आरोसकर टेंब येथील रहिवासी मंगेश राजाराम केनी (वय २२) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४७ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत आकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, पोलीस अंमलदार पाटील आणि खुराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार धोत्रे करत आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली मृत अज्ञात इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.