खुला व शालेय गटात स्पर्धा; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
कणकवली : विकसित भारत सेवा संकल्प अभियानांतर्गत कणकवली भाजपा शहर मंडलच्या वतीने भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खुला गट आणि शालेय गट अशा दोन स्वतंत्र गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेला सहभागी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध रंगांचा वापर करून स्पर्धकांनी आकर्षक व कलात्मक रांगोळ्या साकारत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.
या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्या शितल दळवी, नगरसेविका तथा स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया नलावडे, अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, राजश्री धुमाळे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रदीप गावडे, महेश्वरी चव्हाण, सर्वेश दळवी, मिथुन ठाणेकर, सचिन पारधीये, भाई सावंत, प्रवीण दळवी, लक्ष्मण घाडीगावकर, अमोल रासम, मनोज सावंत, स्वप्निल वर्दम, रवी सावंत तसेच हनुमंत वाळके सर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील खुल्या गटात तिर्था दाभोळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दयानंद कांबळे यांनी द्वितीय तर सिद्धी चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या गटात भक्ती गुरसाळे व श्वेता वाळके तसेच आयुषी पुजारे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
शालेय गटात भक्ती गावडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. परिणीती ठाकूर हिने द्वितीय तर अन्वी बर्वे हिने तृतीय क्रमांक पटकावला. जिया दळवी हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी झालेल्या स्पर्धकांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध कलात्मक संकल्पना साकारल्या. स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सहभागी स्पर्धकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियानाच्या संयोजिका सुप्रिया नलावडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मेघा गांगण, आर्या राणे व मनस्वी ठाणेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजिका सुप्रिया नलावडे तसेच सहसंयोजिका मनस्वी ठाणेकर व आर्या राणे यांनी नियोजन व आयोजनाची जबाबदारी पार पाडली. भाजपा शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.













