संगमेश्वर तालुका शालेय व्हॉलीबाॅल स्पर्धेत देवरूख महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाला विजेतेपद

देवरूख (प्रतिनिधी):

माध्यमिक विद्यालय, ताम्हाणे येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबाॅल स्पर्धेचे(१९ वर्षाखालील गटात) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने पहिल्या सामन्यात दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी संघावर २-० सेटने सहज मात केली. तर अंतिम सामन्यात निवे आश्रम शाळा संघावर २-१ सेटने मात करत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. या शानदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या विजयी संघामध्ये सार्थक आडशे (कर्णधार), वेदांत गवंडी (उपकर्णधार), विजय गुरव, आर्यन पागार, आर्यन खेडेकर, तन्मय नटे, संस्कार गावडे, सिद्धेश लिंगायत, नयन लिंगायत, ओम लिंगायत, आर्यन पेंढारी, साईराज शेलार यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सार्थक आडशे व वेदांत गवंडी यांनी महाविद्यालयाच्यावतीने सर्वांगसुंदर खेळ केला. महाविद्यालयाच्या संघांला क्रीडा प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समिती अध्यक्ष सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनव पातेरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.