नवरात्रीनिमित्त ‘९ × ९ मिशन’ : नऊ दिवसांत निरोगी जीवनाचा संदेश…

 

शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजन..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने ‘वेंगुर्लेकर’च्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘९ × ९ मिशन’च्या चौथ्या आवृत्तीची नोंदणी १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. दररोज किमान ४५ मिनिटे चालणे किंवा धावणे आणि सलग नऊ दिवस व्यायाम करण्याचा संकल्प या उपक्रमातून केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत या उपक्रमातील सहभागींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

यंदाच्या ‘९ × ९ मिशन’मध्ये वर्ल्ड चॅम्पियन विल्सन किप्रॉप सहभागी होत असून, ते दररोज १५ किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर धावणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे या फिटनेस उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या उपक्रमात सहभागी नागरिकांना किमान ३ किलोमीटर ते कमाल ९ किलोमीटरपर्यंत चालता किंवा धावता येणार आहे. हा उपक्रम स्पर्धेपेक्षा ‘फिटनेस’वर केंद्रित राहावा, या उद्देशाने ही मर्यादा ठेवण्यात आली आहे.

‘९ × ९ मिशन’ हा पूर्णपणे व्हर्च्युअल इव्हेंट असून, सहभागी नागरिकांना आपल्या सोयीच्या ठिकाणी आणि वेळेत यात सहभागी होता येणार आहे. दैनंदिन चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे किंवा इतर कोणताही किमान ३० मिनिटांचा व्यायाम पूर्ण करून त्याची माहिती आयोजकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवायची आहे. सहभागींच्या नऊ दिवसांच्या कामगिरीची नोंद ‘शो कार्ड’वर करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी नाममात्र ३०० रुपये नोंदणी शुल्क असून, प्रत्येक नोंदणीकृत सहभागीला ‘९ × ९ मिशन’ टी-शर्ट, आकर्षक पदक आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपक्रमाच्या समारोपावेळी प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते पदक वितरण तसेच अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘९ दिवस – ९ × ९ मिशन – एकच ध्येय : निरोगी जग!’ या संदेशासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नोंदणीसाठी संपर्क : व्हि. प्रदीप – ७४२०८०८४१६, ९४२०७४२४४०.

नोंदणीसाठी : https://forms.gle/eoLKapJi6BXfa9pcA संपर्क करावा , असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.