दोडामार्ग (प्रतिनिधी):श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे यांच्या क्रीडांगणावर सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धांचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अशोक रामू आंबूलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत जाधव, दोडामार्ग तालुका क्रीडा समन्वयक श्री. एच. आर. सावंत, दोडामार्गचे माजी क्रीडा समन्वयक तथा क्रीडा शिक्षक (सोनावल) श्री. अजय सावंत, क्रीडा शिक्षक (कुडासे) श्री. सोमनाथ गोंधळी, पालक श्री. सुनील नाईक आणि शिक्षकेतर कर्मचारी (सोनावल) श्री. सुभाष देसाई यांच्यासह विविध शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. अशोक रामू आंबूलकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कै. प्रमोद शंकर गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्पर्धेच्या सुरूवातीस पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबईचे सचिव कै. प्रमोद शंकर गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोडामार्ग तालुका क्रीडा समन्वयक श्री. एच. आर. सावंत यांनी कै. गवस यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली.
चुरशीच्या लढती आणि क्रीडाप्रेमींची दाद
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी वेग, चपळाई, रणनीती, संघभावना आणि उत्तम खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. विविध शाळांच्या संघांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतींमुळे क्रीडांगणावर प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. खेळाडूंच्या या दमदार कामगिरीला प्रेक्षक व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करत उत्स्फूर्त दाद दिली.
ही स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोडामार्ग तालुका क्रीडा समन्वयक श्री. एच. आर. सावंत यांनी केले.













