दोडामार्ग | सुहास देसाई
शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे दोडामार्ग तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा तालुका समन्वयक सूर्यकांत नाईक नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि बहुमूल्य योगदानाबद्दल दोडामार्ग तालुका पंचायत समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या छोटेखानी आणि कौतुकास्पद सोहळ्याला पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पार्वती गवस, उपसभापती गणेश प्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर, स्नेहा गवस, श्रीमती सोनिया कुबल यांसह विविध पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा शिक्षण समिती सदस्य दीपक गवस व जिल्हा परिषद सदश्या श्रीमती साक्षी तळवडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूर्यकांत नाईक यांच्या सेवाकाळातील विविध उपक्रमांचा आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला. तालुका शिक्षण विभागाने नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या सोहळ्याला गटशिक्षणाधिकारी श्री. निसार नदाफ, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, गट समन्वयक श्रीमती अंजली जोशी तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी विठ्ठल गवस, महेश नाईक, महेश काळे, संतोष केरकर, आणि संतोष गवस उपस्थित होते.
याशिवाय तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ, कार्यालयीन कर्मचारी, तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दोडामार्ग येथील हळबे कॉलेजचे प्राचार्य सावंत सर आणि प्रा.गाथाडे सर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून नाईक सरांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरांतून सूर्यकांत नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











