सिंधुदुर्गातील ५१,१८५ हेक्टर भातशेती करपली!

सरसकट नुकसानभरपाईसाठी पंचनामे सुरू!

कृषी व पशुसंवर्धन विभागाने घेतली २५० बंधाऱ्यांची जबाबदारी!

       जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल 

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा भातशेतीला मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील लागवडीखालील ५१ हजार १८५ हेक्टर भातशेती करपून गेल्याने सुमारे १५ हजार ५६३ शेतकरी बाधित होत असल्याचा आकडा समोर येत आहे.या नुकसानीचे सरसकट पंचनामे सुरू करण्यात आले असून, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यांची कामेही युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. कृषी पशुसंवर्धन विभाग २५० बंधारे येत्या चार दिवसात पूर्ण करणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती व उपाय योजनांबाबत खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे हे जिल्ह्यातील या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे.

जिल्ह्यातील शेतीचे नुकसान आणि भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून २५० बंधारे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, उपलब्ध पाणीसाठा वाढविणे आणि आगामी काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जिल्हात सुमारे दहा हजार बंधारे घालण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे त्यातील आजच्या दिवसापर्यंत ८६९ बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर जलतारा योजनेतून दहा हजार आठशे पंचवीस शोषखड्डे मानाचे उद्दिष्ट आहे त्यातील २३६ खड्डे आज मी तिथपर्यंत पूर्ण झाले आहेत. असेही दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपण कुडाळ तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद मतदार संघाचा बैठक घेऊन आढावा घेतला आहे. कुडाळ तालुक्यात मोठ्या संख्येने क्षेत्र आहे. सर्व शासकीय यंत्रणा सरपंच व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून नुकसान भरपाईचे पंचनामे व बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधनाचा विचार करता दुधाळ व मोठी जनावरे १३५००० तर शेळ्या मेंढ्या ३७२०० मिळून १७२००० पशुधन आहे. पाणीटंचाईची झळ त्याला बसू नये याचे दक्षता पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. ७५ हजार मका बियाण्याचे वाटप केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडामिसे यांनी या संदर्भात एक बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे. शेतामधील व माळ रानावरील हिरवा चारा प्रक्रिया करून साठवून ठेवण्याबाबत नियोजन सुरू आहे अशी माहिती ही उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त रवींद्र दळवी, व जिल्हा कृषी अधिकारी दीशांत कोळप आदि उपस्थित होते.