रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ले अध्यक्षपदी हिरोजी परब तर सचिवपदी पल्लवी भोगटे यांची निवड 

पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न : सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचा संकल्प

 

वेंगुर्ले : दाजी नाईक

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला (RID 3170 | सिंधुदुर्ग झोन)चा सन २०२६–२७ या वर्षाचा पदग्रहण सोहळा वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात रोट्रॅक्टर हिरोजी आत्माराम परब यांनी अध्यक्षपदाची, तर रोट्रॅक्टर पल्लवी गजानन भोगटे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी क्लबच्या नवनियुक्त संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनीही पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाचे इन्स्टॉलिंग ऑफिसर रोट. अमेय वरेरकर (DRR, RID 3170) होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोट. राजेश घाटवळ (सचिव, RID 3170) उपस्थित होते. तसेच रोट. चैतन्य नीलकंठन्वर (जिल्हा सचिव, RID 3170), प्राध्या. रोट. वसंतराव पाटोळे (लिटरसी चेअरपर्सन, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन) आणि प्राध्या. रोट. धनश्री पाटील (एन्व्हायर्नमेंट चेअरपर्सन, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला) यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांचे क्लबच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्लाच्या मागील कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, युवक विकास, शैक्षणिक उपक्रम तसेच समाजोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून वेंगुर्ला परिसरात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संकल्प नवनियुक्त कार्यकारिणीने व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देत कांदळवन संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन यांसह विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.

अध्यक्ष रोट्रॅक्टर हिरोजी परब यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांसाठी उपयुक्त आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सचिव रोट्रॅक्टर पल्लवी भोगटे यांनी आगामी वर्षातील नियोजित उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग व योगदान देणाऱ्या सदस्यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्लाचे सदस्य, रोटरॅक्ट पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोट. प्रितीश लाड व रोट. अमृता पांचाळ यांनी केले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदग्रहण सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

“Together, we make a difference” या ब्रीदवाक्याने नवनियुक्त कार्यकारिणीने आपल्या नव्या कार्यकाळाची सुरुवात केली.