टंचाई व दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्धार

प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुयोग्य असे नियोजन करावे-नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्या सुचना
नगर परिषद विशेष सभा
राजापूर प्रतिनिधी : शहरात दरवर्षी उन्हाळी हंगामात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती याचा विचार करून उपलब्ध पाणीसाठयाचे सुयोग्य नियोजन करून शहरवासीयांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा व टंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. तर टंचाई व दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी निधी मिळावा यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा एकमुखी ठराव या बैठकीत पारित करण्यात आला.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन समन्वयाने नियोजन करावे अशा सुचना यावेळी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी यावेळी दिल्या. तर प्रशासनाकडून संभाव्य टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला असून उपलब्ध पाणीसाठा टिकून रहावा यासाठी शहरात कोदवली धरण परिसरासह कोदवली नदीपात्र व शिळ जॅकवेल अर्जुना नदीपात्रात वनराई बंधारे बांधण्याचे निश्चित करण्यात आले असून गुरूवार पासून वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी सांगितले.
दरवर्षी उन्हाळी हंगामात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील सद्य  परिस्थितीतील पाणीपुरवठयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोंढेतड भागात पाणीपुरवठा वाहिनीला गळती लागल्याने या भागात तसेच शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा मुद्दा नगगसेवक सौरभ पेणकर, साजिय काझी यांनी मांडला. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. ज्या भागात पाणीटंचाईबाबत समस्या आहेत त्याची माहिती यावेळी सभागृहात घेण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने उन्हाळी हंगामात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा स्त्रोत भक्कम करणे, कोदवली धरण व शिळ जॅकवेलकडे दोन मोठे तर अर्जुना व कोदवली नदीपात्रात छोटे १४ असे १५ वनराई बंधारे बांधणे, शहरातील पाणीवितरणातील गळती रोखणे, सार्वजनिक व खासगी विहिरींची स्वच्छता करणे, शिळ जॅकवेलकडील रखडलेले स्वतंत्र विजवाहिनीचे काम पुर्ण करून घेणे, जनरेटर खरेदी करणे, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करणे यासह टंचाई काळात ज्या काही प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील त्याबाबतचा अहवाल कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी सभागृहात सादर केला.
शहरात सध्या विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, वारंवार निर्माण्डा होणाऱ्या तक्रारी याला पाणीपुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी यावेळी केला. तर गटनेते एड. जमिर खलिफे, एड. राहुल तांबे, आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, बांधकाम सुबोध पवार यांनीही यावेळी चर्चेत सहभागी होत प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखीत केली.
पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका
शहरात पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युत पंप लावून होत असलेली पाणी चोरी गंभीर समस्या असल्याचे खुद्द पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी सभागृहात निदर्शनास आणले, कारवाई केल्यानंतर पुन्हा लगेचच प्रशासन पाणीपुरवठा वाहिनी जोडून देते, त्यामुळे कारवाईला काहीच महत्व रहात नाही. यावर भविष्यात याचा शोध पाणीपुरवठा कर्मचारी यांनी घ्यावा व अशा प्रकारे जर का कोणी पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युत पंप लावून पाणी चोरी करत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करतानाच दुष्काळी व टंचाईची परिस्थिती दुर होत नाही तोपर्यंत त्याचे पाणी संयोजन जोडून न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी देखील पाणी चोरी ही शहरात गंभीर समस्या असून त्याला प्रशासनाने पायबंद घालावा असे आदेश दिले.
पाणीपुरवठा विभागातील कामचुकारपणा खपवून घेणार नाही-मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांचा ईशारा
राजापूर शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करणे ही आमची प्रशासन म्हणून प्राथमिकता आहे. राजापूरपेक्षा लांजा नगर पंचायतीचे क्षेत्र मोठे असूनही कमी कर्मचारी वर्गात त्या ठिकाणी चांगले काम होते, मात्र राजापुरात पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत आपण समाधानी नसल्याचे स्पष्ट करत भविष्यात अशा प्रकारे कामचुकारपणा करणारे कर्मचारी असतील वा अन्य यांच्या विरोधात आपण कडक कारवाई करू त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये असा ईशारा मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिला. तर भविष्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन या विभागाचा तात्पुरता पद्भार हा बांधकाम अभियंता रणवीर देसाई यांच्याकडे देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
टंचाई निवारणार्थ सव्वा कोटींचा टंचाईकृती आराखडा सादर
शहरात दरवर्षी उन्हाळी हंगामात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून सव्वा कोटीचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे ५० लाख, विहिर व बोअरवेल दुरूस्ती १० लाख, पंप व मोटार दुरूस्ती ५ लाख, पाईपलाईन दुरूस्ती ५ लाख, गळती नियंत्रण ५ लाख, तात्पुरती पाणी वितरण व्यवस्था ५ लाख, बंधारे बांधणे १० लाख, जनरेटर खरेदी करणे २५ लाख असा सुमारे सव्वा कोटी रूपयांचा टंचाई कृती आराखडा तरार करण्यात आला असून तो शासनाकडे. पाठविला जाणार आहे.
या बैठकीत नगरसेवक दीलीप अमरे, दीलीप चव्हाण, सिध्दांत जाधव, शबाना मुल्ला, अमिना गडकरी, नेहा तानवडे, जान्हवी वादक,  प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर, सान्वी रावण, महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर यांनी सहभाग घेत आपली मते मांडली.