वाकेड येथील पादचारी पुलावरील चारही गर्डर बुधवारी बसवले
संतोष कोत्रे
लांजा : गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या वाकेड येथील पादचारी पुलावरील चारही काँक्रीट गर्डर बुधवारी अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने खांबांवर अचूकपणे बसविण्यात आले. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ओलांडण्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात येत असलेला वाकेड गावातील पादचारी पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत होता. त्यामुळे हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी वाकेड येथील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांतून व्यक्त केला जात होता.
मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या अनेक गावांपैकी लांजा तालुक्यातील वाकेड हे गाव आहे. वाकेड येथे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेला पादचारी पुल मात्र अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नव्हता. या पुलासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला केवळ पिलर उभारण्यात आलेले होते. या ठिकाणी पिलर उभारण्यात आल्यानंतर लवकरच पादचारी पुल पूर्ण होईल अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र जवळपास तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी या ठिकाणी पादचारी पुल पूर्ण होऊ शकलेला नाही.
वाकेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महामार्गावरून दिवसभर वेगाने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागत होता .
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी या पादचारी पुलावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन, असे एकूण चार मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात पादचारी पूल नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान,
पादचारी पूल पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनाही सुरक्षितपणे महामार्ग ओलांडणे शक्य होणार आहे.













