देवगड : महावितरणच्या स्मार्ट मीटर कार्यक्रमाच्या टेस्टिंगसाठी महावितरणकडूनच विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे देवगड शहरातील स्ट्रीटलाईट काही काळ उशिराने सुरू झाल्या. मात्र, देवगड-जामसांडे नगरपंचायतीने वीजबिल थकीत ठेवल्यामुळे स्ट्रीटलाईटचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची प्रसिद्ध झालेली बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले.
स्ट्रीटलाईटसाठी वापरण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमध्ये विशिष्ट वेळेनुसार विद्युत पुरवठा सुरू-बंद करण्याचे प्रोग्रामिंग करण्यात येत आहे. त्यानुसार सायंकाळी सहा वाजता स्ट्रीटलाईट सुरू होऊन सकाळी सात वाजता बंद होण्याची व्यवस्था स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रणालीची टेस्टिंग आज देवगड शहरात महावितरणकडून करण्यात आली.
देवगड-जामसांडे नगरपंचायतीकडून महावितरणचे कोणतेही वीजबिल थकीत ठेवण्यात आलेले नाही. नगरपंचायतीने वेळेत वीजबिलाचा भरणा केला असून, बिल थकीत असल्यामुळे स्ट्रीटलाईटचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती चुकीची असल्याचे मुख्याधिकारी माने यांनी सांगितले.
स्मार्ट मीटरच्या टेस्टिंग आणि प्रोग्रामिंग प्रक्रियेमुळे आज स्ट्रीटलाईटचा विद्युत पुरवठा नेहमीपेक्षा काहीसा उशिराने सुरू झाला. सध्या देवगड शहरातील स्ट्रीटलाईट सुरळीत सुरू असून शहर प्रकाशमान असल्याचेही मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले.













