देवगड येथे ११ ऑक्टोबरपासून ‘इंद्रधनू नवरात्र उत्सव’

*देवगड येथे ११ ऑक्टोबरपासून ‘इंद्रधनू नवरात्र उत्सव’*

*प्रसाद कुळकर्णी यांची माहिती*

*२० ऑक्टोबरला रंगणार ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी’*

*नवरात्र उत्सवात इंद्रधनू संस्थेचा ‘जलसंवर्धनाचा संकल्प’*

देवगड / प्रतिनिधी
इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत देवगड शहरातील कॉलेज रोडनजीकच्या पाटणकर कंपाऊंड (सारस्वत बँकसमोर) रात्री ९.३० वाजता नवरात्र उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी हा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला असून यात सुप्रसिद्ध गायक व ‘भारत का अमृत कलश’ विजेता सिद्धेश जाधव व सुप्रसिद्ध गायिका व सूर नवा ध्यास नवा फेम तृप्ती कुडाळकर हे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य आनंद रामाणे, मिलिंद मोर्ये, राजीव पडवळ, वैभव केळकर, किरण कांबळी, यतीन कुळकर्णी, अमोल वंजारे, भावेश पटेल, प्रशांत पटेल, दिनेश पटेल उपस्थित होते. प्रसाद कुळकर्णी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने इंद्रधनू संस्थेच्यावतीने नवरात्र उत्सवाचे दिमाखदारपणे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्र उत्सवात सहभागी होणाऱ्या निवडक कलाकारांचा सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. यात लक्षवेधी चेहरा, बेस्ट स्माईट, बेस्ट कॉस्च्युम, इंद्रधनू इस्टा क्विन, इंद्रधनू इन्स्टा किंग, किंग ऑफ दांडिया नाईट, क्विन ऑफ दांडिया नाईट अशा प्रकारची विविध १२ बक्षीसे दररोज सलग नऊ दिवस देण्यात येणार आहेत. तर २० ऑक्टोबर रोजी ९.३० वाजता दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात ‘भारत का अमृत कलश विजेता’, ‘होऊ दे धिंगाना’ फेम सिद्धेश जाधव व सूर नवा ध्यास नवा फेम तृप्ती कुडाळकर हे सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. कुळकर्णी यांनी दिली.
सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून पाण्याचा प्रत्येक थेंब बचत करणे काळाची गरज आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्यावतीने जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. ‘उत्सव साधेपणाचा, संकल्प जलसंवर्धनाचा’ या संकल्पनेला अनुसरून यंदाचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे, असेही प्रसाद कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.