चिपळूण (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण-१ अंतर्गत शिरगाव बीटमध्ये ‘पोषण महा’ मोहिमेचा सांगता समारंभ उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. महिनाभरात राबवण्यात आलेल्या विविध पोषणविषयक जनजागृती उपक्रमांचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य विनया झगडे उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी बालक, गरोदर माता आणि स्तनदा माता यांच्या योग्य पोषणाचे व आरोग्याचे महत्त्व विषद केले. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या तळागाळातील कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी माजी सरपंच पल्लवी शिंदे, बंगाल, सावरटकर यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी सदस्य व सदस्या उपस्थित होते. या कार्यक्रमास अंगणवाडी पर्यवेक्षिका, बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सकस आहार, पोषणमूल्ये व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वर्षभर सातत्यपूर्ण काळजी घेण्याचा संकल्प करण्यात आला. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













