सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा गावागावांत पोहोचविण्याचे नियोजन
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण पंचायत समिती येथे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदवी रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेला पंचायत समिती सभापती सूर्यकांत नारायण खेतले, जिल्हा परिषद सदस्य पूजा शेखर निकम, गटविकास अधिकारी उमा शिवाजीराव घारगे-पाटील, पंचायत समिती सदस्य स्नेहा अभिजित साळवी, उज्वला विजय घाग, मनस्वी मंदार बैकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती अमोल यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर आदी उपस्थित होते. तसेच बामणोलीचे सरपंच सुदेश गोपाल गमरे, शिरगावच्या सरपंच नीता निलेश शिंदे, भिलेच्या सरपंच आदिती अविनाश गुढेकर, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी सुनीता गांधी तसेच पत्रकार प्रतिनिधी योगेश बंडागळे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते.
कार्यशाळेत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये विविध विभागांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त करून आरोग्य विभागाच्या उपक्रमांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रात्यक्षिके आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपक्रमाची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. गावपातळीवर विविध पथके तयार करून प्रत्यक्ष केलेल्या कामांचा आढावा घेण्यासोबतच आरोग्यविषयक उपक्रम राबविताना येणाऱ्या अडचणींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्व घटकांना समान, दर्जेदार, सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ हा उपक्रम चिपळूण तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल जानवलकर यांनी केले. कार्यशाळेच्या नियोजनासाठी डॉ. निकिता शिर्के, राजेंद्र पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, शैनाल सावंत, सुमित गमरे, योगेश कांबळी, अमोल साळवी, दर्शना खंदारे आणि आकांक्षा कोळवणकर यांनी सहकार्य केले. डॉ. रूपा मयेकर यांनी आभार मानले.













