देवगड: श्रीकृष्ण नगरात अवतरणार कोल्हापूरची महालक्ष्मी!

देवगड तालुक्यातील नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या विविध रूपांचे दर्शन घेण्याची भाविकांना संधी

 

देवगड : प्रतिनिधी :जामसंडे येथील श्रीकृष्ण नगर रहिवासी संघातर्फे आयोजित नवरात्रोत्सवात यंदा कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या विविध रूपांचे दर्शन भाविकांना घडणार आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची विविध रूपांत आकर्षक पूजा बांधली जाते. त्याच धर्तीवर श्रीकृष्ण नगर येथेही देवीची विविध रूपे साकारण्यात येणार आहेत.

 

या विशेष उपक्रमासाठी कोल्हापूर येथील खास कलाकार येणार असून, त्यांच्या कलाकौशल्यातून अंबाबाईची विविध रूपे साकारली जाणार आहेत. त्यामुळे जामसंडे येथील श्रीकृष्ण नगरात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची अनोखी संधी भाविकांना मिळणार आहे.

 

देवगड तालुक्यातील नवरात्रोत्सवाचे हे एक खास आकर्षण ठरणार असून, भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण नगर रहिवासी संघ, जामसंडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.