बांदिवडे येथील श्री देव लखमेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता; ‘वराह अवतार व बाल गणपतीचे विराट रूप’ चित्ररथाने वेधले लक्ष

मसुरे | झुंजार पेडणेकरमालवण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या बांदिवडे येथील श्री देव लखमेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे अत्यंत भाविक आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सप्ताहाच्या काळात टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचे नामस्मरण आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण बांदिवडे व परिसर भक्तिमय रंगात न्हाऊन निघाला होता.

पंचक्रोशीतील भजन मंडळांची सुरेल सेवा

सप्ताहाच्या सातही दिवसांत गावातील तसेच परिसरातील विविध नामांकित भजन मंडळांनी मंदिरात आपली गायन व भजनाची सेवा अर्पण केली. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या भजनांच्या सुरेल सुरांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. या धार्मिक उत्सवानिमित्त मंदिर परिसरात व मुख्य रस्त्यांवर आकर्षक आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर रात्रीच्या वेळी उजळून निघाला होता.

सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काढण्यात आलेल्या दिंडी मिरवणुकीत बांदिवडे मळावाडी मंडळाने सादर केलेला ‘वराह अवतार आणि बाल गणपतीचे विराट रूप’ हा चित्ररथ सर्व उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अत्यंत कलात्मक रीतीने साकारलेल्या या देखाव्याचे आणि कलाकारांच्या कौशल्याचे पंचक्रोशीतील भाविकांनी भरभरून कौतुक केले.

रात्रीच्या वेळी श्रींच्या पालखीसह निघालेल्या दिंडी मिरवणुकीत शेकडो भाविक भक्तीने तल्लीन होऊन सहभागी झाले होते. फुगड्या, मृदंगाचा ताल आणि ‘जय जय विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग’च्या घोषात निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान गगनभेदी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. सर्व घटकांच्या उस्फूर्त सहकार्यामुळे हा हरिनाम सप्ताह अत्यंत दिमाखदार आणि स्मरणीय ठरला.