टंचाईकृती आराखडा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना
प्रशासनाने अधिक सतर्क व सजग रहावे
आ. सामंत यांनी घेतला तालुक्याचा आढावा
राजापूर प्रतिनिधी : कमी पडलेल्या पावसामुळे तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आला आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच ग्रामपंचायतींसह सगळयांनी योग्य पध्दतीने नियोजन करावे. भविष्यात उपयुक्त ठरणारा पाणीसाठा व्हावा म्हणून गावोगावी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावेत. अशी सूचना आमदार किरण सामंत यांनी दिल्या. प्रशासनाने याबाबत अधिक सतर्क व सजग रहावे अशा सुचनाही आ. सामंत यांनी यावेळी दिल्या.
दुष्काळ कालावधीतील निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईसह विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आ. किरण सामंत यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीत संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये समाविष्ट करायच्या विविध कामांचे प्रस्ताव येत्या चार दिवसांमध्ये ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. भातपिकासह अन्य पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचनाही आ. सामंत यांनी यावेळी दिल्या.
आ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, पंचायत समितीच्या सभापती नंदीनी कदम, तहसिलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दिपक नागले, पोलिस निरिक्षक अमित यादव, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, प्रशासक, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
लघु पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यातर्गंत बांधलेल्या धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याची सविस्तर माहिती या विभागांकडून देण्यात आली. भविष्यातील टंचाईच्या काळात उपयुक्त ठरणारा पाणीसाठा धरणांमध्ये करण्याचे आतापासून नियोजन करण्याची सूचना आ. सामंत यांनी या विभागांना दिल्या. वीजजोडणीअभावी रखडलेल्या नळपाणी योजनांना तात्काळ वीजजोडणी देवून त्या नळपाणी योजना कार्यान्वित कराव्यात अशी सूचनाही आ. सामंत यांनी वीजवितरण विभागाला दिल्या.
यावेळी पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तालुक्यामध्ये दिड हजारहून अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन झाल्याची माहिती दिली. दुष्काळ कालावधीतील पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठकीमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तालुक्यात पूर्ण झालेली कामे आणि सद्यस्थितीमध्ये चालू असलेली कामे याचा सविस्तर आढावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार यांनी दिला. जलजीवन मिशन योजनेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करून तालुक्यातील ‘हर घर जल’ असलेली जास्तीत जास्त गावे जाहीर करावीत अशी सूचनाही आ. सामंत यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्या. तहसिलदार विकास गंबरे यांनी शानातर्फे जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये राजापूर तालुक्याचा समावेश असल्याचे स्पष्ट करताना दुष्काळग्रस्त तालुक्यातील लोकांना कोणकोणत्या सवलती मिळणार आहे याची माहिती दिली. विहीर वा विंधन विहिर उभारणीसाठी आवश्यक जागांच्या संमतीपत्रासाठी सहकार्य करण्याचेही आश्वासित करण्यात आले. भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी दिली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, कृषी, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग यांच्यातर्गंत जलसंधारण संबंधित सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.













