राजापुरात कळसवली गावात शिकारीसाठी फिरणाऱ्या तीन जणांना राजापूर पोलीसांनी रंगेहात पकडले

विनापरवाना बंदूक, बोलेरो पिकप गाडीसह दोन लाख दहा हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर पोलीसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अभियानांतर्गत पेट्रोलिंग करत असताना शुक्रवारी मध्यरात्री कळसवली गावात विनापरवाना ठासणीच्या बंदुकीसह शिकारीसाठी फिरणाऱ्या तीन जणांना राजापूर पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. राजापूर पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील व सहकाऱ्यांनी मध्यरात्री अडीज वाजता ही धडक कारवाई केली आहे.

यामध्ये सिंगल नळी असलेली जुनी वापरती गावठी ठासणीची विनापरवाना एक बंदूक, शिकारीसाठी वापरण्यात येणारे टॉर्च, बोलेरो पिकप गाडी असा एकूण दोन लाख दहा हजार ३२० रुपये असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. राजापूर पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अमित कृष्णा बाणे, योगेश नारायण बाणे रा. कळसवली व विजय काशिनाथ तरळ राहणार तरळ वाडी कळसवली या तीन जणांविरोधात आर्म ऍक्ट 3/25(1)(क), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन घोगले यांची फिर्याद नोदविण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी व उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट ऑपरेशन अभियान राबिले जाते. राजापूर शहर आणि तालुक्यातही पोलीसांकडून रात्री हे गस्तीचे अभियान सुरू आहे.

शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीज वाजण्याच्या दरम्यान राजापूर पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील आपल्या सहकाऱ्यांसह ओणी व पुढे कळसवली परिसरात जात असताना कळसवली परिसरात अशा प्रकारे शिकारीसाठी बोलेरो पिकप गाडी घेऊन संशयीत रित्या फिरणारे तीन जण आढळून आले. पाटील यांनी तात्काळ या तीघांना हटकले असता त्यांच्याकडे सिंगल नळी असलेली जुनी वापरती गावठी ठासणीची एक बंदूक, शिकारीसाठी वापरण्यात येणारे टॉर्च असे साहित्य आढळून आले. त्यांनी तात्काळ या तीघांना या मुद्देमालासह ताब्यात घेत कारवाई केली.

जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी व उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, सागर खंडागळे, पोलीस कर्मचारी नितीन घोगले, दीपक काळे, श्री. शिवणकर, श्री. जाधव या सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे