दांडी परिसरातील जीर्ण वीजवाहिन्या व वीज साहित्य बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा
आमदार निलेश राणे यांचे नागरिकांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील दांडी परिसरात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वीज वितरणकडे वारंवार तक्रार करूनही वीज समस्या कायम होत्या. या प्रश्नी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार निलेश राणे यांनी विज अधिकाऱ्यांना तात्काळ परिसराचा सर्वे करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वीज वितरण च्या माध्यमातून तात्काळ कार्यवाही होत दांडी परिसरात जीर्ण झालेल्या विद्युत तारा, वीज साहित्य बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत माहिती शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये यांनी दिली आहे.
आमदार निलेश राणे यांनी दांडी वासियांच्या वीज समस्यांची तात्काळ दखल घेत वीज प्रश्न तत्परतेने सोडवल्याबद्दल दांडी परिसरातील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. जनहिताच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांची नेहमीच तत्पर व आग्रही भूमिका असते असेही उपस्थित नागरिकांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, दांडी परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी नगराध्यक्षा ममता वाराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, शहरप्रमुख राजू बिडये, महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सुधाकर मालंडकर, अरविंद आचरेकर, राज धुरी, नीलेश केळूसकर, उमेश आचरेकर, रामचंद्र पराडकर, योगेश पराडकर, जगदीश खराडे, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर, मुकुंद आचरेकर यांसह अन्य नागरिक उपस्थित होते. नागरिकांशीही यावेळी संवाद साधण्यात आला.
याबाबत मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर व नगरसेवक महेश कोयंडे यांनीही आमदार निलेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत. अन्वेषा आचरेकर म्हणाल्या दांडी किनारपट्टी परिसरातील सुमारे 25 वर्षा पूर्वीच्या विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. जोरदार वारे तसेच पावसाळा कालावधीत अनेक वेळा जीर्ण वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. दांडेश्वरवाडी, श्रीकृष्णवाडी, झालझूलवाडी परिसरात कमी दाबाची समस्या गेली ७ -८ महीने होती. तेथील ग्रामस्थांनी याबाबत वीज वितरण विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र ठोस उपाययोजना होत नव्हत्या. अनेक वर्षांपासून असलेले येथील वीज वाहिन्या व साहित्य पुर्णपणे जीर्ण झाल्याने वीज समस्या गंभीर बनल्या होत्या. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांच्या वीज उपकरणांचे ही नुकसान होत होते. या प्रश्नी दांडी परिसरातील नागरिकानी नगरसेवक महेश कोयंडे व माझ्या उपस्थितीत आमदार निलेश राणे यांची भेट घेतली.
यावेळी नगराध्यक्षा ममता वाराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना शहर प्रमुख राजू बिडये यांचेही सहकार्य लाभले. सर्वांच्या उपस्थितीत दांडी परिसरातील गंभीर बनलेल्या वीज समस्येबाबत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार निलेश राणे यांनी विज अधिकाऱ्यांना तात्काळ परिसराचा सर्वे करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या वीज तारांचा व गेल्या अनेक महिने भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानंतर अवघ्या आठ दिवसात मार्गी लागत आहे. दांडी परिसरात जीर्ण वीज वाहिन्या व वीस साहित्य बदलण्याचे काम गतिमानपणे प्रगतीपथावर आहे. दांडी परिसरात दोन विद्युत ट्रांसफार्मर मिळावेत याबाबत ही मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली असून त्याबाबतही योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आमदार निलेश राणे आणि निर्देश दिले आहेत. याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच नगराध्यक्षा ममता वराडकर, मोहन वराडकर यांनीही वीज वितरणकडे पाठपुरावा केला. वीज वितरणच्या माध्यमातून गतिमानपणे काम सुरू आहे.
आमदार निलेश राणे यांची तत्पर कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित!
जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांची तातडीने सोडवणूक करण्याची आमदार निलेश राणे यांची तत्पर कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली तसेच जनतेने अनुभवली. दांडी परिसरातील जीर्ण विद्युत वाहिन्या आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जनतेच्या मागणीची तात्काळ दखल घेत आवश्यक कार्यवाहीला गती दिल्याबद्दल नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि नगरसेवक महेश कोयंडे यांनी आभारव्यक्त केले. तसेच मालवणच्या विकासकामांमध्ये सातत्याने बहुमोल योगदान देणारे आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे त्यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.













