देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाच्या ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सोनवडे येथे आयोजित ७ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रा. आतिश माईनकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी पारितोषिक वितरण व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या समारोप कार्यक्रमाला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा नेहा जोशी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, कनिष्ठ महाविद्यालय शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सरिता सोलकर, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, शिक्षिका सुलेखा मोहिते, ग्रामस्थ राजन खेडेकर, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, भागडे काका आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रा. मयुरेश राणे यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालातून शिबिराच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध श्रमदान, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला. आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनाच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना, शिबिरामधील विविध उपक्रमांतील उत्स्फूर्त सहभाग, जबाबदारीची जाणीव, शिस्त, नेतृत्वगुण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे स्वयंसेवकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट गट क्र. ३ व ४ यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट गटप्रमुख म्हणून कस्तुरी गिते व रसिक बावधने यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून जान्हवी चव्हाण, तन्वी हिरवे व पायल शिवगण यांना, तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून रुतिक जाधव आणि रसिक बावधने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपक्रमशील स्वयंसेविका म्हणून भाविका माईन, साक्षी विश्वास व रिद्धी गुरव यांना गौरविण्यात आले. उपक्रमशील स्वयंसेवक म्हणून अभिषेक सुर्वे आणि दत्तप्रसाद झेपले यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट डायरी लेखनसाठी शेजल बेटकर, दत्तप्रसाद झेपले, कस्तुरी गिते व जान्हवी चव्हाण यांना गौरविण्यात आले.

समारोपाप्रसंगी प्रा. वसंत तावडे, मुख्याध्यापक श्री. बंडगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून, स्वयंसेवकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सौ. जोशी यांनी स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी शिक्षक व विद्यार्थी स्वयंसेवकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.