खेड :
नवरात्रोत्सव म्हटलं की देवीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि दांडियाचा उत्साह! खेडमध्ये यंदाही श्री अंबाभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘नमो दांडिया’चा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या वतीने ११ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी दिली आहे.
खेडवासीयांच्या सहकार्याने गेल्या १९ वर्षांपासून श्री अंबाभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाच्या उत्सवात घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत देवीची प्राणप्रतिष्ठापना, राजोपचार पूजा, आरती, देवीचा गोंधळ-जागर, सप्तशती पाठवाचन, विविध अभिषेक, कुमारिका पूजन आणि नवचंडी हवन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे दररोज रात्री आठ वाजता रंगणारी ‘नमो दांडिया’ स्पर्धा! दांडिया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले असून, विजयादशमीच्या दिवशी अंतिम तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात दांडियाच्या तालावर थिरकण्याची संधी खेडकरांना मिळणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त दीपोत्सव आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, तर २१ ऑक्टोबर रोजी उत्तरपूजा आणि श्री देवीच्या विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे.
धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी तरुणाई, असा उत्साहपूर्ण माहोल खेडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. या नवरात्रोत्सवात नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी केले आहे.













