माडखोल बोडणपूल येथे उभारला बंधारा

जिल्हा परिषद शाळेचा जलसंधारणासाठी स्तुत्य उपक्रम

माडखोल । लखन आडेलकर :महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या महत्त्वपूर्ण मोहिमेत माडखोल गावातील जिल्हा परिषद शाळा माडखोल नंबर १ ने सक्रिय सहभाग नोंदवत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला आहे. वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी शाळेच्या वतीने पुढाकार घेत लोकसहभागातून बंधारा उभारण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत आज माडखोल-बामणादेवी रस्त्यावरील बोडणपूल येथे बंधारा घालण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले होते. या सामाजिक कार्यात केवळ विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण गावाने सहभाग घेतला. बंधाऱ्याच्या कामात गावातील सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई, आरोग्य कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. या बंधाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या पिशव्या ग्रामपंचायत माडखोल यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच जलसंधारणाविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे. दरम्यान, माडखोल गावातील इतरही विविध ठिकाणी अशाच प्रकारे बंधारे घालण्याचे नियोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाळेच्या आणि ग्रामस्थांच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.