रत्नागिरी:प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातून एका ५३ वर्षीय कापड व्यावसायिकाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सज्जन अमरचंद ओसवाल (५३, रा. घर नं. १९१८, रामआळी, अमरसन्स गारमेंट, रत्नागिरी) असे अपहरित व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी रोहित सज्जन ओसवाल ( २७, व्यवसाय कापड व्यवसाय) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार.अपहरित सज्जन ओसवाल हे ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार येथील ‘यश ट्रेडर्स’ या दुकानातून चुलतभाऊ निर्मल रमेश ओसवाल यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा शोध घेऊनही ते कुठेही आढळले नाहीत.
सज्जन ओसवाल यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून बळजबरीने पळवून नेऊन त्यांचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये (जुने कलम भा.द.वि. ३६३ प्रमाणे) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











